वसंतगड हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तळबीड या गावात आहे. हा किल्ला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कऱ्हाड यांच्या दरम्यान रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. वसंतगड आणि तळबीड गाव हे वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
या महामार्गावरील तळबीड गावाच्या फाट्याला उतरून तीन कि. मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला गावी जावे लागते. तसेच कराड-पाटण मार्गावरून वसंतगड फाट्याला उतरून एक कि. मी. उत्तरेकडे गडाच्या पायथ्याला जावे लागते. कराडवरून एस. टी. बसेसची सोय आहे. वसंतगड हा इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई याचे हे गाव आहे.
इतिहास :
वसंतगड किल्ल्याची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली. इ.स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड स्वराज्यात समावेश करून घेतला. मसूरचे पूर्वापार वतनदार असलेले महादजी जगदाळे यांचा वसंतगड हा बालेकिल्ला होता. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली.अर्थात महाराजांना विरोध करणे त्यांना भागच पडले. महादजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिवंत सापडला.महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगडाचा स्वराज्यात समाविष्ट करून घेतला.याच महादजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता.जिजाऊ साहेबांनी अगदी आजीच्या मायेने या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते.
दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेब (इ.स १६१८ ते इ.स १७०७) याने दक्षिणेत मराठ्यांविरुद्ध मोहीम उघडली.छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीने मराठी राज्याचे संरक्षण केले. आणिं औरंगजेबाने १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई यांनी मोगलांविरुद्ध टक्कर दिली.त्यानंतर औरंगजेबाने वसंतगड घेण्याची मोहीम उघडली तोफखाना प्रमुख मीर आतिश तरबियतखानाने मोगली तोफा आणून किल्ल्याच्या तटावर मारा सुरू केला. चार दिवसांत वसंतगड मोगलांचा जिंकला.आणि किल्ल्याचे नाव ‘किल्ली दे फते’ अर्थात यशाची किल्ली असे करण्यात आले.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
१.प्रवेशद्वार :
गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे.तरी काही अवशेष पाहायला मिळतात.
२. गणेशाची मूर्ती :
किल्ल्याच्या आत जाताच डाव्या हाताला एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे.मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीला लाल रंग लावला आहे.ही मूर्ती काळ्या दगडात कोरलेली आहे.
३.महादेव मंदिर :
किल्यावरती महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी शंकराची पिंड आहे तसेच समोर एक पार्वतीची मूर्ती आहे.
४.हनुमान मंदिर :
किल्ल्यावरती हनुमानाची एक मूर्ती आहे. मंदिर पडक्या अवस्थेत आहे.मंदिराच्या दगडी बांधकामाचे अवशेष अजूनही शिल्लक आहे.
५.चंद्रसेन महाराजांचे मंदिर :
सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे.मंदिराच्या बाहेर दोन नदी आहे तसेच दोन दगडी दीपमाळ आहे. चैत्र महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते.मंदिर जुन्या बांधणीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्रा भरवली जाते.
६.राजवाड्याचे अवशेष :
पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजूने मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात.
७.जुन्या समाध्या :
कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.
८.बुरुज :
चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
९.सरसेनापती हंबीरराव मोहिते समाधी :
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.
यांची समाधी वसंतगड पायथ्याशी असलेल्या तळबीड या गावात आहे. समाधी स्थळावर भव्य असे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर एक जुनी तोफ आहे.समाधी ही चोकोनी आकाराची असून आत सुंदर असे बगीचा आहे.
कसे जाल?
वसंतगडास भेट देण्यासाठी आधी कराडला जावे लागते.कराड एसटी थेट तळबीड गावात जाते. येथून उत्तरेला दहा कि.मी. अंतरावर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तळबीड गावात दाखल झाल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते. गावातूनच किल्ल्यावरती वाट जाते. किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी १ तास लागतो. दुसरा रस्ता सुपने या गावातूनही आहे.तिसरा रस्ता हा वसंतगड या गावातून जाणारा आहे. हा रस्ता पूर्वीचा राजमार्ग असून एका खिंडीमार्गे कोकणात उतरतो.