Shivneri fort शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.शिवनेरी किल्ला हा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. हा किल्ला पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर आहे.हा किल्ला चारही बाजूंनी वरच्या उतारांनी वेढलेला आहे.
शिवनेरी किल्ल्याचा आकार शिव-पिंडीसारखा आहे.जुन्नर शहरात प्रवेश करताच हा किल्ला आपल्या नजरेस पडतो. हा किल्ला क्षेत्रफळात इतका मोठा नाही.ईस्ट इंडिया कंपनीचे डॉ. जॉन फ्रायर यांनी १६७३ मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे की, हा किल्ला एक हजार कुटुंबांच्या गरजा भागवण्यासाठी ७ वर्षे पुरेल एवढा अन्नसाठा करू शकतो. शिवनेरी किल्ला (shivneri Fort) – ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला गिर्यारोहकांच्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास:
‘जीर्णनगर’,म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती.सातवाहण राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.इ.स. १४४३ मध्ये मलिक – उल–तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली.
पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी राजानी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले.शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाईला जीजाऊनी नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन.
शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इ.स १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६३२ मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते.त्यांचा कन्याचा विवाह शहाजी पुत्र संभाजी राजे यांचाशी झाला होता.जुन्नर रणसंग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजी राजे यांनी पराक्रम केला होता.इतिहासात दुर्लक्षित युद्ध शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांचा अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिकंता आलं नाही परिस्थिती अशी होती. जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी होती. सन १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले.यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स. १६७३ मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न राजे शिवाजीने केला. शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही.शिवरायांचा त्यांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिकंता आले नाही अशी नोंद आहे.
पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.इ.स.१७५५ च्या पेशवे-आंग्रे युद्धानंतर नाना साहेब पेशव्यानीं तुळाजीला शिवनेरीवर कैदत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदारांची मदत घेतली होती. त्यामुळे नाना साहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारचीं वतने,जमिनी,जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे. इ.स. १७६४ मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणीती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याचं कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली.शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते. रामचंद्र माने याने १५ सप्टेंबर १७६४ रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती.
महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात अश्याच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यानी जीवधन, चावंड, हडसर यासारख्या किल्लांचा ताबा घेतला होता. वारंवारं होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन १७७१ मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते.१८ एप्रिल १७७४ रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते.अशी नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली. सन १० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.
शिवनेरी गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
१. सात दरवाजे :
शिवनेरी किल्ल्यावर येतांना सात दरवाजे लागतात.पहिला दरवाजा हा महादरवाजा,दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा, तिसरा दरवाजा हा पीर दरवाजा, चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा, पाचवा दरवाजा हा शिपाई दरवाजा, सहावा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा आणि सातवा दरवाजा म्हणजे मेना दरवाजाअसे शिवनेरी किल्ल्यावर सात दरवाजे आहेत.
२ .शिवाई देवीचे मंदिर :
सात दरवाज्याने गडावर येताना शिपाई दरवाजा नावाचा पाचवा दरवाजा ओलांडून मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळले की तुम्ही शिवाईच्या मंदिरात पोहोचता. या मंदिरामागील खडकात ६-७ गुहा आहेत.मंदिरात शिवाईची मूर्ती आहे.
३.अंबरखाना :
शेवटच्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर अंबरखाना दिसतो. यात खूप नुकसान झाले आहे. पूर्वी ते अन्नधान्य साठवण्यासाठी वापरले जायचे.
4. शिवकुंज :
हे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. त्याची पायाभरणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी केली होती आणि त्याचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते. बाल शिवाजी (बालपणातील शिवाजी) आपली छोटी तलवार फिरवत आपल्या आई जिजामातेला आपल्या स्वप्नांचे वर्णन करीत आहे, ही शिवकुंजमध्ये उभारलेल्या या स्मारकाची थीम आहे.
5. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान :
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवकुंजसमोर शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशी इमारत आहे. ही दुमजली इमारत आहे, ज्याच्या तळमजल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे.
6. कडेलोट कडा :
वरील ठिकाणासमोरून जाणारा रस्ता कडेलोत कडा.याचा उपयोग गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे.
७.बदामी तलाव :
गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात व तिथे दोन अशा बसण्याच्या जागा आहे जिथे आधीच्या काळात उन्हाळ्यात थंडगार वाटेल अशी व्यवस्था होती.बदामी तलावाच्या मध्यभागी एक खांब आहे ज्यांनी पाहिले तलावाच्या पाण्याची पातळी मोजली जात होती.
८.तानाजी मालुसरे उद्यान :
शिवनेरी गडावर गेल्यानंतर पीर दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे.उद्यानात विविध प्रकारची झाडे आहेत.
कसे जाल ?
By Air
Nearest Airport – Pune
By Train
Nearest Railway Station – Pune Station
By Road
About 100 km from Pune railway station.