anjur ganapati

ठाण्यातील अणजूर गावात असलेले अपरिचित असे श्री सिद्धिविनायकाचे गणपती मंदिर 

आपल्याकडे महाराष्ट्रात गणेशाची अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्यापैकी एकवीस गणेश ठिकाणे अत्यंत प्रसिद्ध आहेत.श्रीगणेशाची विविध ठिकाणं विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. त्याची ही सगळी रुपं, त्यांच्यामागच्या कथा  हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहरापासून जवळच असलेल्या अंजुर या गावी असलेल्या गणपती विषयी माहिती या लेखात पाहणार आहोत.हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे. हे मंदिर मुंबईपासून सुमारे ३२ किलोमीटर अंतरावर आहे. या गणपती मंदिराला सुमारे ३०० वर्षाचा इतिहास आहे. हे मंदिर एक खाजगी देवस्थान आहे.

मंदिराचा इतिहास:

या मंदिराची स्थापना इसवी सन १७१८ मध्ये गंगाजी नाईक या सरदारांनी केली. इ.स. ११०० मध्ये मुंबईवर  बिंब राजाची सत्ता होती. मुंबईतील माहीम येथे त्यांनी आपली राजधानी वसवली होती. त्यानंतर वसईवर सन १५३३ पासून पोर्तुगीजांची सत्ता होती.वसईसोबतच कल्याण, ठाणे, मुंबई आणि रेवदंडा या भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. सन १६६१-६२ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्नेच्या विवाहानिमित्त पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून दिली. पण ठाणे, कल्याण आणि रेवदंडा भागात पोर्तुगीजांची सत्ता सुरूच राहिली. पोर्तुगीजांनी इथल्या जनतेवर धर्मप्रचाराच्या नावाखाली अनेक अत्याचार केले. अनेक स्थानिक लोकांची वतने काढून घेतली. या जाचाला कंटाळून येथील प्रांत पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी कल्याणजवळच्या गंगाजी नाईक या सरदारांनी प्रयत्न सुरू केले.

साष्टी प्रांतात त्यावेळी पाठारे क्षत्रिय समाजाची मोठी वस्ती होती. बिंबराजाबरोबर तेराव्या शतकात मराठवाड्यातून ज्या काही क्षत्रिय जाती उत्तर कोकणात आल्या. त्यापैकी ही एक जात. त्यात सहासष्ट गावे होती, म्हणून त्यास साष्टी म्हणत. इ.स.१५३४ ते १७३९ अशी सुमारे दोनशे पाच वर्षे उत्तर कोकणात पोर्तुगिजांची सत्ता होती. पोर्तुगिजांची सत्ता असताना फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले. १५८० ते १५९० या काळात तर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गावेच्या गावे बाटवली. धर्मातराच्या भीतीने जे गाव सोडून जंगलात गेले.

बिंबदेव राजाच्या काळात त्यांना ‘नाईक’ ही पदवी मिळाली. हे घराणे कालांतराने ठाण्यातील अणजूर गावी स्थायिक झाले. तेव्हा गणपतीने त्यांना दृष्टांत देऊन चिंचवडला मोरया गोसावींकडे जाण्यास सुचविले. दृष्टांतास अनुसरून सन १७१८ मध्ये ते मोरगावला चालत गेले. तेथे मोरया गोसावींचे पणतू चिंतामणी यांनी त्यांना अनुग्रह दिला आणि आपल्या पूजेतील उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती दिली. वसईच्या विजयानंतर सन १७४१ मध्ये गंगाजींनी मोरगाव येथून आणलेल्या गणपती मूर्तीची आपल्या अणजूर येथील राहत्या एकमजली वाड्यात प्रतिष्ठापना केली. हाच वाडा आज ‘अणजूरकर नाईकांचा वाडा’ म्हणून प्रसिद्ध आहे.

ठाणे-नाशिक रस्त्यापासून तीन किलोमीटरवर अणजूर गावातील वाड्यात  तळमजल्यावर लाकडाच्या मखरामध्ये या मूर्तीची स्थापना केलेली आहे. लाकडी मखराच्या खांबांवर सिंहाची  शिल्पे आहेत. मखराच्या बाहेर काचेच्या तावदानात मोठ्या समया सतत तेवत असतात. लाकडी मखराच्या आत एक दालन असून त्या दालनात चौरंगावर मखरामध्ये उजव्या सोंडेच्या मूर्तीचे आसन आहे. मखराच्या चार खांबांवर सुंदर घुमट आहे.

मंदिर परिसरात पाहण्यासारख्या गोष्टी :

हा वाडा पेशवेकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. वाड्याचे बांधकाम लाकडी खांब, लाकडी तुळया आणि लाकडी फळ्यांचा वापर करून झालेले आहे, तर छत कौलारू आहे. वाड्यामध्ये खुंट्या, देवळ्या, कोनाडे, लाकडी जिने असे अनेक जुने घटक पाहायला मिळतात. वाड्याचा लाकडी दरवाजा, त्याची चौकट, खांब आणि यांच्यावरील नक्षीकाम पेशवेकाळाची साक्ष देतात. भिंतीवर विविध चित्रे लावलेली आहेत. त्यात कै. विनायक गणपतराव नाईक यांनी १९३४ मध्ये संकलित केलेली ‘नाईक इनामदार (अणजूरकर) घराण्याची वंशावळ’ आहे.

 गंगाजी नाईक यांचे चित्र आहे. या वाड्याभोवती भिंतीचे कुंपण असून वाड्याच्या शेजारीच जुना तलाव आहे. नाईकांच्या वंशजांनी श्री सिद्धीविनायक देवस्थान ट्रस्टची स्थापना केली असून त्याच्या विश्वस्त मंडळाकडून या देवस्थानाची देखभाल होत असते. http://www.siddhivinayakanjur.org या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती मिळू शकते.

कसे जाल?

भिवंडी तालुक्यातील अणजूर गावी जाण्यासाठी ठाणे आणि भिवंडी येथून एसटी उपलब्ध आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या उड्डाणपुलावरून टीएमटीची बस क्र. ८७ अलिमघरपर्यंत जाते. अलिमघरच्या एक कि.मी. आधी अणजूर गाव येते. माणकोली ते अणजूर शेअर रिक्षा देखील मिळतात. खासगी वाहने थेट वाड्यापर्यंत जातात. ठाणे-नाशिक रस्त्यावरून हॉटेल लोटसजवळ अणजूर गावात जाण्यासाठी फाटा आहे. तिथून तीन कि.मी.वर वाडा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top