दातेगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पाटण तालुक्यातील पाटण या गावी आहे.पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक लाल कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैभव म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.दातेगडाला भव्य असा इतिहास आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १०२७ मीटर उंचीवर आहे. या गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्टर आहे.
दातेगड किल्लाचा इतिहास :
दातेगड किल्ला पंधराव्या शतकात शिर्क्यांच्या ताब्यात होता. मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करून हा किल्ला बहामनी राज्यात सामील केला. बहामनी राज्याचे तुकडे झाल्यावर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. १५७२ मध्ये सरदार पाटणकरांना या किल्ल्याची देशमुखी मिळाली होती. अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. त्यांनी गडाची जबाबदारी पाटणकर सरदारावर टाकली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला.
दातेगड किल्ला इसवी सन १६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. त्यावेळी सरदार संताजी घोरपडे आणि पाटणकरांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी त्यांना पाटण महालातील ३४ गावे इनाम दिली होती. इसवी सन १७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकून घेता आला नाही. विशेष सांगण्याची बाब म्हणजे ज्यांनी तिन्ही छत्रपतीचा काळ पाहीलेले आहे असे रामचंद्र आमात्य बावडेकर यांचे या गड़ावर तीन महिने वास्तव्य होते. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगड किल्लावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
दातेगड किल्लावरील पाहण्यासारखी ठिकाणे :
१ .गणेशाची मूर्ती :
पश्चिम तटावरील भग्न दरवाज्याशेजारी सहा फूट उंचीची गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. ही मूर्ती लाल दगडात कोरलेली आहे.
२.हनुमंताची मूर्ती :
या मूर्तीशेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची हनुमंताची मूर्तीही आहे.मूर्तीला लांब अशी शेपटी आहे.
३.तलवारीच्या आकाराची विहीर :
हा सर्व परिसर पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. ही विहीर तलवारीच्या आकारासारखी आहे.
४.महादेवाचे देऊळ :
विहिरीत पायऱ्यांनी खाली तळाकडे गेल्यानंतर पाण्याच्या थोडे अलीकडे डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे देऊळ लागते. या छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे.
५ .तटबंदी :
ही विहीर पाहून परत वर येऊन गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात ८-१० फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.
६.जुन्या राजवाड्याचे अवशेष :
गडावरती जुन्या राजवाडयाचे अवशेष पाहायला मिळतात. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा १९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते.
कसे जाल?
जवळचे रेल्वे स्थानक:कराड
जवळचे बस स्थानक:पाटण
दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्यता आहे. टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायऱ्यांच्या वाटेने गडावर पोहोचता येते. आधी वर्णन केलेल्या दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात.