maharastra nisrga

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात आनंद घेण्यासाठी ५  मनोरंजक उपक्रम

महाराष्ट्र निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती हे हेतू डोळ्यांपुढे ठेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुढाकार घेऊन महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची निर्मिती केली. आज निसर्ग उद्यान या परिसरातून फेरफटका मारला असता सर्वच हेतू संपूर्णपणे सफल झाल्याचे दिसून येते.मुंबई शहराच्या एकेकाळच्या क्षेपण भूमी वर तयार करण्यात आलेले निसर्ग उद्यान म्हणजे मानवनिर्मित जंगलाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. ह्या मानव निर्मित जंगलालाच जोडून माहीमच्या खाडीतील (मिठी नदीच्या पात्रातील) तिवराची नैसर्गिक जंगले आहेत.

नैसर्गिक संपदेचा वारसा टिकवून ठेवणे व त्याची (त्या सोबतच्या सर्वच प्रकारच्या जैविक संपदेसह) संवर्धन करणे ह्या हेतुने साकारलेल्या ह्या निसर्ग उद्यानात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत आपण मुंबईसारख्या गच्च दाटीवाटीच्या शहराच्या मध्यभागी आहोत ह्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडतो. नियमितपणे पुन्हा पुन्हा येत राहणाऱ्या प्रेक्षकांची वाढती संख्या हेच सुचवते कि, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि निसर्गाचे नियम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी निसर्ग उद्यानासारखे उत्तम स्थळ नाही.

महारष्ट्र निसर्ग उद्यानाचा इतिहास : 

सन १९७७ च्या दशकाच्या अखेरीस महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची धारावीमधील ही ३७ एकर जमीन केवळ एक गलिच्छ कचरा क्षेपण क्षेत्र होती. मार्च, १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) च्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. जून, १९७७ मध्ये मुंमप्रवि प्राधिकरणाने बीकेसीचे नियोजन प्रस्ताव प्रकाशित केले तसेच त्यासाठी सूचना व आपत्ती आमंत्रित केल्या होत्या.मुंमप्रवि प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या नियोजन प्रस्तावासंदर्भात सूचना देण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू  एफ – भारत ने मुंमप्रविप्रा यांच्याशी संपर्क साधून त्यांना बीकेसी मधील ‘एच’ ब्लॉक हा महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या निर्मितीसाठी आरक्षित ठेवावा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे बीकेसीच्या नियोजन प्रस्तावामध्ये ह्या ३७ एकर क्षेत्राचा समावेश करून तो महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला व त्यास महाराष्ट्र शासनाने १९७९ साली परवानगी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या नागरी विभागाने सप्टेंबर, १९७९ साली मुंमप्रवि प्राधिकरण यांच्या अधिपत्त्याखाली महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या विकासासाठी एक प्रकल्प गट स्थापन केला व त्यांना ३७ एकर जागेचा विस्तृत अभ्यास करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे प्रकल्प गटाने विस्तृत अभ्यास करून प्रकल्पाचा अहवाल जून, १९८२ मध्ये शासनाकडे सादर केला. महाराष्ट्र शासनाने सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुंमप्रवि प्राधिकरणावर सोपवली आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेले अनुदान राज्य सरकारकडून मुंमप्रवि प्राधिकरण यांना देण्यात यावे अशी तरतूद शासनाच्या अर्थसंकल्पात केली.

सन १९८२ – १९८३ मध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या विकासाची कामे मुंमप्रवि प्राधिकरणाने हाती घेतली. मुंमप्रवि प्राधिकरणाच्या विनंतीनंतर जागा साफ करण्यापासून ते झाडे लावण्याचे काम डब्ल्यू डब्ल्यू एफ – भारत यांच्याकडे सोपविण्यात आली. सन १९८३ साली डॉ. सलीम अली यांच्या हस्ते पहिले सदाहरित झाड उद्यानात लावण्यात आले. त्यानंतर झाडे लावण्याच्या मोहिमेत मुलांना विशेषतः शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासामावून घेतले. जून, १९८४ मध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानामध्ये शैक्षणिक इमारत केंद्राचे काम मुंमप्रवि प्राधिकरणाने हाती घेतले.सन  १९८७ मध्ये पुन्हा डॉ. सलीम अली यांनी पाच स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण केले. त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, पळस आणि आंबा या जातींचा समावेश आहे.

जैवविविधता :

वनस्पती संपदा :

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात एकूण १४,००० झाडांची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये वृक्ष, झुडूप आणि वानस यांच्या प्रजातींचा समावेश आहे. उद्यानात लागवड करण्यात आलेल्या वनस्पती ह्या अनेक टप्प्यांमध्ये लावण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे ते मुंबई शहरातील हिरवा पट्टा राहिला नसून त्याचं जंगलामध्ये रुपांतर झाल आहे.उद्यानात हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडुनिंब, वड, उंबर,पळस यांसारख्या बऱ्याच वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

सरपटणारे व उभयचर प्राणी :

महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची भूमी म्हणजे मुंबई शहराची एकेकाळची क्षेपण भूमी. त्यावर विविध प्रकारच्या सरीसृपांचे वास्तव्य आधी पासूनच होते. क्षेपण भूमीवरील उंदीर हे ह्या सापांचे खाद्य होते. ह्या क्षेपण भूमीवर लावण्यांत आलेल्या झाडांच्या वाढी बरोबरच हे मानव निर्मित वन वाढू लागले व ह्या सर्व सरिसृपांना जगण्यासाठीचा आधार मिळाला. आसपासच्या तिवरांच्या जंगलातील काही सरिसृप इथे आश्रयाला आले तसेच शहरातून पकडण्यांत आलेल्या काही सापांना इथे पुनर्वासीत करण्यात आले. अन्नाची व निवाऱ्याची उपलब्धता प्राप्त झाल्याने अशा सर्वच प्रकारच्या सरीसृपांनी आता इथे आपले चांगलेच बस्तान बसवले आहे.

किटक, पाली, सरडे, बेडूक, उंदीर व छोटे पक्षी हे ह्या सर्व सरीसृपांचे खाद्य. निसर्ग उद्यानातील अन्न साखळ्यांमध्ये हे सर्व घटक सापडत असल्याने सरीसृप निसर्ग उद्यानाच्या अन्न साखळ्यांमध्ये व्यवस्थितपणे सामावले गेले आहेत. सरीसृपहे शीत रक्ताचे प्राणी असल्याने थंडीच्या दिवसात ते खडकांसारख्या जागी ऊन शेकताना दिसतात. धामण, घोणस, पाण दिवड, नानेटी तसेच विविध प्रकारचे सरडे व पाली हे सहज दिसणारे सरिसृप. भारतात आढळणाऱ्या चार विषारी सापांपैकी नाग व घोणस ह्या विषारी प्रकारच्या सापांचा उद्यानात अधिवास आहे.निसर्ग उद्यानातील वर्षा  पावसाळी पाणी साठवणूक तलावाचा परिसर हे उभयचरांच्या निरीक्षणाचे उत्तम स्थळ. निसर्ग उद्यान येथे आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सरीसृपांच्या व उभयचरांच्या निरीक्षणासाठीचे उत्तम स्थळ आहे.

कोळी

उद्यानात जवळ जवळ ३० विविध प्रकारचे कोळी असून ते ११ कुळांमध्ये विभागले आहेत. उद्यानात असलेल्या होल, झुडूप व वृक्ष हे त्यांच्या जाळे विणण्याचे मुख्य स्थान झाले आहेत. कोळ्यांना असलेल्या विचित्र अश्या शरीर रचनेमुळे ते नेहमीच घाबरून टाकणारे, कुरूप आणि विचित्र प्राणी म्हणून त्यांच्याकडे काही वेळा बघितले जाते. म्हणूनच ते दुर्लक्षित आहेत. परंतु पारिस्थितिक तंत्रज्ञानामधील त्यांची भूमिका व त्यांच्याबद्दल सर्व गोष्टी जाणून घेतल्या तर त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल. एक शक्तिशाली शिकारी, एक कुशल शिकारी आणि चांगले आक्रमण करणारे प्राणी आहे तसेच ते आपल्या सभोवतालचे परिसर मच्छर आणि किटक खाऊन स्वच्छ ठेवण्यात व त्यांची लोकसंख्या नियंत्रण करण्यास मदत करतात. उद्यानात सापडणारे कोळी लहान कीटकांवर जगत असून त्यांच्यावर पक्षी आणि पाली हे उपजीविका करतात त्यामुळे ते अन्नसाखळीमधील महत्वाचे भाग बनले आहेत.

सस्तनप्राणी

वटवाघूळ, खारुताई व उंदीर हे उद्यानात नियमितपणे आढळणारे सस्तन प्राणी आहेत. त्यामध्ये खारुताई तर उद्यानात प्रत्येक ठिकाणी आढळते.

पक्षी

अलीकडच्या वर्षात विकासाच्या क्रियाकलपांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेषतः शहरीकरण त्यामुळे नैसर्गिक स्त्रोतांवरत्यांचा विपरीत परिणाम दिसू लागला आहे. तसेच विकास कामे आणि वन्य जीवांचे संतुलन साधणे सोपे नाही. शहरीकरण झालेल्या सर्व क्षेत्रांमध्ये पक्ष्यांची विविधता आणि घनता कमी होत चालली आहे. परंतु मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानासारखी हरित पट्टा तयार करून पक्षांच्या संवर्धनास हातभार लावला आहे. उद्यानातील अनुकूल अश्या वातावरणामुळे शहरी तसेच स्थलांतरित पक्षांची ही हक्काची अधिवासाची जागा बनली आहे.एका बाजूला मिठी नदीचा परिसर आणि दुसऱ्या बाजूला गजबजलेले शहरीकरण, यांच्या मध्यभागी असलेल्या या उद्यानात १२५ पेक्षा जास्त पक्षांच्या प्रजाती आढळतात. त्या जवळजवळ भारतात सापडणाऱ्या एकूण प्रजातींच्या १०% आहे.  त्यामध्ये स्थलांतरित पक्षांचा देखील समावेश आहे. कीटकनाशक, स्वछ्ताकर्मी तसेच फळे खाणाऱ्या पक्षांचा उद्यानात वावर आढळतो. त्याचप्रमाणे असामान्य प्रजातींची देखील येथे नोंद आहे.मुंबई शहराच्या मध्यभागी असल्यामुळे अभ्यांगतासाठी पक्षी निरीक्षण, पक्षी अभ्यासक आणि पक्षी छायाचित्रण यासाठी उद्यानहे चांगले स्थान आहे. उद्याना मध्ये आढळून येणाऱ्या काही पक्षांची नावे: शिंपी, स्वर्गीय नर्तक,कोकीळ, गायबगळा, साळूंखी, खंड्या,पोपट, पंचरंगी सूर्यपक्षी, तांबट आणि नाचरा.

फुलपाखरू

आपल्या बहुतेक जणांसाठी वन्यजीवांचा प्रवास हा आपल्या घरे, उद्यान किंवा बागेच्या आसपास दिसणाऱ्या फुलपाखरांच्या मागे धावून होतो. फुलपाखरांना असलेल्या आकर्षित रंगबिरंगी रंगानी, त्यांच्या विस्मयकारक आकारांसह आणि फुलांनी भरलेल्या झुडूपांजवळ घिरट्या घालताना आपल्याला आकर्षित करून टाकतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात सन १९९७ – ९८ च्या दरम्यान पहिल्यांदा फुलपाखरांचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये ३४ प्रजातींची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर सावधपणे करण्यात आलेल्या निरीक्षण व संशोधनानुसार सध्या उद्यानात ८५ प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. फुलपाखरू विभागाची निर्मिती करून महाराष्ट्र निसर्ग उद्यान त्यांच्या संवर्धनामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. उद्याना मध्ये आढळून येणाऱ्या काही फुलपाखरांची नावे: ब्लू मॉरमॉन, कॉमन क्रो,कॉमन पामफ्लाय, प्लेन टायगर, ब्लू टायगर, स्ट्रीप्ड टायगर, कॉमन जे, कॉमन मॉरमॉन, चॉकलेट पॅन्सी,  कॉमन जुजेबेल.

शैक्षणिक विभाग : 

निसर्गाचे संवर्धन, शिक्षण व त्या विषयीची जनजागृती ह्यामध्ये उद्यान नेहमीच अग्रेसर असतो. तसेच भेट देणाऱ्या निसर्गप्रेमींना निसर्गाचे शिक्षण देण्यासाठी उद्यानात वेगवेगळे शैक्षणिक विभाग आहेत.

फुलपाखरू विभाग : 

फुलपाखरांना असलेल्या रंगेबिरंगांमुळे लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत आकर्षणाच विषय बनले आहेत. ह्या विभागात विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करता येतो. फुलपाखरे मध गोळा करण्यासाठी कोणत्या फुलांवर बसतात, परागीकरण कसे होते तसेच त्यांच्यामध्ये असलेले छदमवेष आणि एक प्रजातीच्या फुलपाखरासारखी दिसण्याची केलेली नक्कल असे बरेच काही येथे शिकायला मिळत.मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात फुलपाखरांची बाग तयार करून महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने फुलपाखरांचे संरक्षण करण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. सध्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात एकूण ८५ प्रकारची फुलपाखरे बघायला मिळतात.

नक्षत्र वन : 

ज्या वृक्षाची आराधना/पूजा केली जाते तो आराध्यवृक्ष होय. भारतीय पंचागानुसार, ज्या नक्षत्रावर माणसाचा जन्म होतो ते त्याचे जन्म नक्षत्र होय. अशी एकुण २७ नक्षत्रे आहेत. त्या प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. संकटकाळी व तब्येत खराब झाली तर आराध्यवृक्षाची आराधना फलदायी होते. आयुर्वेदानुसार,प्रत्येक वृक्ष हा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात औषधीच आहे. विशीष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तिसाठी विशीष्ट वृक्षाची आराधना ही फलदायी होते. किमान २१ दिवस वृक्षाची आराधना करावी.हे आराध्यवृक्ष देवतासमान असल्यामुळे त्या त्या जन्मनक्षत्रवाल्या व्यक्तिंनि त्याला औषधासाठीहि तोडु नये. याच तत्वावर, भारतात जागोजागी नक्षत्र उद्यान निर्माण होत आहेत.

पावसाळी पाणी साठवणूक : 

उद्यानातील झाडांना पावसाळा ऋतू संपल्यानंतर हिवाळा व उन्हाळा या कोरड्याच्या महिन्यांमध्ये सरासरी ४५,००० हजार ते १ लाख लिटर पाणी हे शिंपणासाठी आवश्यक असते. निसर्ग उद्यान मुख्यतः महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून असते. परंतु सिंचनासाठी उद्यानात पावसाळी पाणी साठवणूक प्रकल्प तयार करण्यात आला आहे आणि त्यामुळे जवळजवळ २.५ कोटी लिटर एवढ्या पावसाळी पाण्याची साठवणूक उद्यानात केली जाते, त्यामुळे सिंचनासाठी उद्यान आत्मनिर्भर आहे.उद्यानात दोन प्रकारे पाणी साठवणूक केली जाते एक म्हणजे शैक्षणिक इमारतीच्या छतावरून आणि दुसरे म्हणजे उद्यानामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी चर बनविण्यात आले आहेत. त्यामधून एका तलावात हे पाणी साठविले जाते. आता हे प्रकल्प भेट देणाऱ्या अभ्यांगतांना पावसाळी पाणी साठवणूक कशी करावी याची माहिती आणि प्रात्याक्षिक देण्यासाठीचे उत्तम उदाहरण बनले आहे.

वृक्षाच्छादित विभाग : 

या विभागातपर्यावरणाचा समतोल आणि जैवविविधता टिकवण्यासाठी असलेली झाडांची भूमिका याची कल्पना येते. हा विभाग सर्वात मोठा विभाग असून येथे वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष, झुडुपे, वेली, गवत आणि वानस पहावयास मिळतात.

फळझाडे विभाग : 

आपल्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा समावेश असतो. अश्या फळझाडांची ह्या विभागात लागवड करण्यात आली असून त्यांची माहिती अभ्यांगताना ह्या विभागात दिली जाते.कल्पवृक्ष/ताडीच्या जातीच्या झाडांचे विभाग : ह्या विभागात ११ प्रकारच्या ताडीच्या जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

औषधी वनस्पती विभाग :

 प्रत्येक झाडाला काहींना काही औषधी गुणधर्म हे असतातच. पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक व उनानी इ. औषधी पद्धती प्रचलित होत्या. त्यामध्ये वनस्पतींचा वापर करून औषधे बनविली जात. अशीच काही वनस्पतींची ह्या विभागात लागवड करण्यात आली असून त्यांच्या औषधी गुणधर्मांची माहिती ह्या विभागात दिली जाते.

रोपवाटिका विभाग : 

विविध औषधी आणि जंगली वनस्पतींना मागणी असल्यामुळे उद्यानामध्ये एक रोपवाटिका देखील आहे. येथे रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच ह्या विभागात बीजप्रक्रिया, बीज संगोपन, बियांची उगवण प्रक्रिया आणि रोपवाटिकेचे व्यवस्थापन याबद्दल माहिती या विभागात दिली जाते.

गांडूळखत विभाग :

 अगदी प्राचीन काळापासून सेंद्रिय शेती प्रचलित असून पिढ्यानपिढ्या ह्या पर्यावरण पूरक शेतीचा वापर केला जात आहे. सेंद्रिय खतांमध्ये बरेच प्रकार आहे. त्यातील एक म्हणजे गांडूळ खत. उद्यानात गांडूळखत प्रकल्प उभे करण्यात आले असून त्यामध्ये उद्यानातील पालापाचोळा गोळा करून त्याचा वापर गांडूळखत निर्मितीसाठी कसा केला जातो यांचे प्रात्यक्षिक या विभागात दिले जाते.

सुगंधीत व मसाले वनस्पती : 

आपल्या आहारात वापरात असलेल्या मसाले ज्या वनस्पतींपासून बनविले जाते त्यांची लागवड या विभागात केली आहे. तसेच, सौंदर्य प्रसाधन, अत्तर इ. बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुगंधी वनस्पती या विभागात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

उद्यानामध्ये दोन मुख्य विभाग आहेत:

वृक्षाच्छादित क्षेत्र : 

शैक्षणिक केंद्र- 

जेथे मुंबई शहर व उपनगरामधील शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी/ विद्यार्थीनींना निसर्ग संवर्धन, शिक्षण व जनजागृती याबद्दल माहिती दिली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या, १६ मार्चच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि यासभोवतालचा १८० हेक्टरचा परिसर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या अंतर्गत ‘संरक्षित वन’ म्हणून घोषित करण्यात आला.त्यानंतर उद्यानात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या, जसे की शैक्षणिक केंद्र, निसर्ग फेरीची पायवाट, उद्यानाच्या चारही बाजूला कुंपण, जलाशय आणि रोपवाटिका. दि. २२ एप्रिल, १९९४ ‘वसुंधरा’ दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र निसर्गाचे उद्घाटन डॉ. प. अलेक्झांडर, राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कचरा क्षेपण भूमीचे नियोजन करणे हा आजच्या काळात मोठा जागतिक यक्ष प्रश्न आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यान हा त्यावर शोधलेला उपाय आहे. वेगवेगळ्या देशातील तसेच शहरातील अभ्यांगत येथे केलेले प्रयत्न व त्याचे परिणाम पाहण्यासाठी येतात. येथे केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहण्यासाठी भेट देणारे प्रत्येक मान्यवर, अभ्यांगत त्याचप्रमाणे जगातील वैज्ञानिकांनी उद्यानाची प्रशंसा केली आहे. निसर्गाबद्दल जागरूकता आणणाऱ्या कार्यक्रम तसेच उपक्रमांचा उद्यानाला भेट देणाऱ्या अभ्यांगतांना फायदा होतो. उद्यानातील कार्यक्रमांमुळे जसे की निसर्ग फेरी, कार्यशाळा, परिसंवाद तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे अभ्यांगतांना निसर्ग रक्षणाचे महत्व कळते. उद्यानाच्या उत्साह व नाविन्यपूर्ण दृष्टीकोनामुळे लोकांच्या निसर्गाच्या ज्ञानाचे क्षितीज वाढत आहे व त्यामुळे लोकांना निसर्गाची गुंतागुंत समजण्यास मदत होत आहे.आता हे उद्यान मुंबईच्या“उद्याच्या चांगल्या हवामानाच्या आशेचे” चिन्ह बनला आहे.

कसे जाल ? 

मुंबईतील मध्य रेल्वेच्या सायन स्थानकावर उतरल्यानंतर पूर्वेला चालत 60 मिनिटांच्या अंतरावर हा किल्ला आहे.

By Air

 Nearest Airport – Mumbai

By Train

Nearest Railway Station –  Sion Station

By Road

It is about 2 km from Sion Railway Station.

उद्यानाची उद्दिष्ट:

मुंबईतील नागरिकांना हिरवी वने व प्रदूषणमुक्त भागाचा अनुभव देणे.

नागरिकांमध्ये विशेषतः विद्यार्थी व युवक वर्गांमध्ये, निसर्ग व पर्यावरणाशी संबंधित प्रशिक्षण व जागृती निर्माण करणे.

महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था

मुंमप्रवि प्राधिकरणाने उद्यानाचे व्यवस्थापन व देखभाल करण्यासाठी, संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेची १९९२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि १३ नियामक मंडळाच्या सदस्यांसह नोंदणी करून स्थापना केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top