गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारात उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
गुढीपाडव्याचा इतिहास :
महाभारतातील उल्लेख महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात. महाभारतातच खिलपर्वात कृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतो. महाभारत ग्रंथातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात.
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला. प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‘ या नाटकांमध्ये आले आहेत
वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो.
भारतातील विविध प्रकारचे गुढीपाडवा :
भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे.
भारतातील विविध प्रांतांत :
१)बंगाल :’नोब बोर्ष’ हे वर्ष १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) सुरू होते..
२)पुंथंडु : तामिळनाडू- १४ एप्रिल
३)उगादी: आंध्र प्रदेश
४)बिहू : (आसाम) – १५ एप्रिल..
५)विशु : केरळ – १३-१४ एप्रिल
६)बैशाखी : (पंजाबी वर्षारंभ) ही दरवर्षी १३ किंवा १४ एप्रिलला (सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्या दिवशी) असते.
गुढीपाडवा उत्सवाचे स्वरूप :
1. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते
महाराष्ट्रात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.
2. गुढीपाडव्याला पारंपरिक वेशभूषा करतात
गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी महिला वेगवेगळ्या प्रकारचे साड्या परिधान करतात .महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे विविध पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पोशाख परिधान करतात.
3. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते –
महाराष्ट्रात ठिकठिकाणी गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठया रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लेझिम, ढोल ताशे,बाइक रॅली आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग होतात.
४) महाराष्ट्रातील प्रसिद्ध गुढीपाडवा शोभायात्रा :
महाराष्ट्रात घरोघरी जल्लोषात गुढी उभारून, रस्त्यांवरून शोभायात्रा काढून नववर्षांचे स्वागत होते.त्यात काही प्रसिद्ध अश्या शोभायात्रा आपण आज पाहणार आहोत.
1) गिरगाव :
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गिरणगावात मराठमोळय़ा विभागांमध्ये यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता फडके श्री गणेश मंदिरापासून होते.या शोभयात्रेत विविध प्रकराचे देखावे सादर केले जातात. रांगोळ्यांच्या पायघड्या, दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक यांचा समावेश या शोभायात्रेत असतो..
२)डोंबिवली :
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित दरवर्षी नववर्ष पालखी सोहळा साजरा करण्यासाठी डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी सहभागी होतात. दरवर्षी या सोहळय़ाच्या निमित्ताने फडके रोड गर्दीने व्यापलेला असतो.हिंदू नववर्ष पालखी सोहळय़ानिमित्त श्री गणेश मंदिरात गणपतीला अभिषेक, मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम अध्यक्ष यांच्या हस्ते होतो. डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्त्यावरील नाख्ये समूहाच्या मारुती मंदिरातून पालखी सोहळय़ाला गुढी उभारून प्रारंभ करण्यात येते.पालखी सोहळय़ात विविध प्रकारच्या मागण्या करणारे संस्था कार्यकर्ते हातात फलक घेऊन सहभागी होतात.
३)ठाणे :
ठाण्यातील श्री कोपीनेश्वर मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी नववर्ष पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो. या शोभायात्रेची सुरुवात कोपीनेश्वर मंदिरापासून होते.